ताज्या बातम्यानांदेडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीयशेत-शिवार

अब्दुल सत्तार यांनी बेसन भाकरीवर मारला ताव


अमरावती विभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी नांदेडकडे जाताना थोडावेळ तालुक्यातील वरुडबिबी व नागेशवाडी शिवाराची पाहणी केली.
त्यावेळी सकाळपासून आपण दौऱ्यात व्यस्त आहे. तुम्ही तरी जेवलेले असाल, माझी तर बॅटरी डिस्चार्ज होत चालली आहे, असे म्हणताच. उपस्थित शेतकऱ्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. कृषीमंत्र्यांनी बांधावर बसूनच शेतकऱ्यांनी आणलेल्या बेसन भाकरीवर ताव मारला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या सरबराईसाठी तालुक्यातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित होते. कृषी मंत्र्यांच्या सरबराईसाठी तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी केलेली बडदास्त पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या.



यवतमाळ जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार शनिवारी यवतमाळ येथून नांदेडकडे जाताना त्यांचा उमरखेड तालुक्यातील दौरा निश्चित नव्हता. परंतु, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गोपाल अग्रवाल यांच्या विनंतीवरून मंत्री सत्तार यांनी सुकळी येथे थांबून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार नामदेव ससाने त्यांच्यासोबत होते.

उमरखेडला कोणत्याही गावात थांबण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे उमरखेड येथील काँग्रेसचे युवा नेते जिल्हा सरचिटणीस गोपाल अग्रवाल यांनी अब्दुल सत्तार यांना संपर्क करून आम्हाला निवेदन द्यायचे आहे, आपण थांबावे, अशी विनंती केली. त्यानंतर सत्तार यांनी सुकळी नागेशवाडी परिसरात थांबून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव तातु देशमुख, माजी आमदार विजय खडसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल, माजी पं. स. सदस्या संगीता वानखेडे व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री सत्तार सुकळी येथे थांबल्यानंतर ते म्‍हणाले की, दौऱ्यात काहीही खायला मिळाले नाही. आपली बॅटरी डिस्चार्ज होत आहे. मला भूक लागली आहे खाण्याची व्यवस्था करा. उमरखेडला थांबून तुमची व्यवस्था करतो, असे गोपाल अग्रवाल यांनी म्हटल्यावर नको, येथेच काय होते का? पहा असे त्‍यांनी सांगितले. त्यानंतर सुरोशे यांच्या शेताच्या बांधावरच झुणका भाकर कांदा व आंब्याचे रायते असा जेवणाचा बेत तात्काळ केला. मंत्री सत्तार यांच्यासह सर्वांनी तिथेच जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊन ते नांदेडकडे रवाना झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button