यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे
११ ऑगस्ट २०२२ या दिवशी सकाळी १०.३९ वाजल्यापासून श्रावण पौर्णिमा चालू होते. सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
१. ‘निर्णयसिंधु’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ‘भद्रा करण असतांना रक्षाबंधन करू नये. दिवसा भद्रा करण असेल, तर भद्रा करण संपल्यावर रात्री ते करावे’, असे सांगितले आहे. हे रक्षाबंधन प्रतिपदायुक्त पौर्णिमा तिथीस करू नये.
२. ‘धर्मसिंधु’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ‘श्रावण पौर्णिमेचे दिवशी अपराण्हकाली अथवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावे; मात्र त्या वेळी भद्रा करण वर्ज्य करावे.’
अपराण्हकाली भद्रा करण असल्यामुळे प्रदोष काळात भद्रा करण संपल्यानंतर, म्हणजे रात्री ८.५१ ते ९.५६ हा कालावधी रक्षाबंधनासाठी सर्वाेत्तम काळ आहे. (काहींच्या मते ‘प्रदोषकाल हा सूर्यास्तानंतर केवळ ९० मिनिटे’ इतकाच मानला जातो; मात्र या ठिकाणी ‘प्रदोषकाल हा रात्रीमानाचा १ चतुर्थांश भाग’, असे मानले आहे.)
वरील वेळेत रक्षाबंधन करणे शक्य नसल्यास पुढीलप्रमाणे पर्याय वापरावेत !
अ. रक्षाबंधनाच्या संदर्भात दुसरा पर्याय : ‘ज्योतिर्मयूख’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भद्रा करणाचा पुच्छ काळ सर्व कार्यांसाठी शुभ सांगितला आहे. त्यानुसार सायं. ५.१७ ते ६.१९ या वेळी रक्षाबंधन करावे.
आ. तिसरा पर्याय : ‘ज्योतिर्मयूख’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भद्रा करणाचा मुखाचा काळ (साधारण सायं. ६ ते रात्री ८.१५) वर्ज्य करून सकाळी १०.३९ वाजल्यानंतर दिवसभरात कधीही रक्षाबंधन करावे.
इ. चौथा पर्याय : ‘ज्योतिर्मयूख’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चंद्र मकर राशीत असेल, तर भद्रा करणाचे स्थान पाताळात असल्याने त्याचा पृथ्वीवरील कार्यासाठी दोष लागणार नाही. त्यामुळे पौर्णिमा असतांना कधीही रक्षाबंधन केले, तरी चालेल.
(टीप : तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण मिळून पंचांग सिद्ध होते. त्यांपैकी भद्रा हे करण अशुभ मानले जाते. भद्रालाच ‘विष्टी’, तसेच ‘कल्याणी’ या नावांनी संबोधले जाते.)