‘बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे’, बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल …

पुणे : खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे या मागणीनंतर राजकारण ढवळून निघाले. पुण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनेक ठिकाणी कुलकर्णी यांच्यावर टीका करणारे बॅनर लावले आहेत.
”कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं”, असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. या बॅनरवर नावे असणाऱ्या कार्यकर्त्यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे.
बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा असे फ्लेक्स झळकवणाऱ्या तिघांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश गायकवाड, अतुल दिघे, विलास सोनवणे अशी त्यांची नावे आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यात कमलेश प्रधान या व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे बॅनर झळकवण्यात आले होते. कोथरूडच्या बाई तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर फ्लेक्स वर होता. फ्लेक्स झळकवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम ३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाल्या कुलकर्णी?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे.. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे.. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे..
या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे.. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही.. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात.. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात.. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा कुरली बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.