इराणचा मोठा निर्णय! अखेर ‘त्या’ प्रस्तावाला मंजूरी, संपूर्ण जगाची झोप उडणार …

इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने प्रवेश केल्यामुळे आता संघर्ष आणखी चिघळला आहे. हे यु्द्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण इराणने अमेरिकेचा बदला घेण्याची घोषणा केली आहे. तसेच अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर सुमारे 30 क्षेपणास्त्रे डागली आहेत.
तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेम या शहरांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र आता इराणी संसदेत मोठा प्रस्ताव पारित झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या तयारीत
समोर आलेल्या माहितीनुसार, इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी घेणार आहेत.
इराणच्या या पावलामुळे तेलाच्या किमती वाढणार
जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याती शक्यता आहे.
भारतात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता
भारत मध्य पूर्वेतील देशांमधून तेलाची आयात करतो. भारताला लागणारे 50 टक्के तेल आणि नैसर्गिक वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतात. भारत 40 टक्के एलएनजी कतारमधून आणि 10 टक्के इतर आखाती देशांमधून आयात करतो. तसेच भारत 21 टक्के तेलाची आयात इराक आणि उर्वरित इतर आखाती देशांमधून करतो. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केला तर भारतातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. तसेच भारतातून आखाती देशांमध्ये निर्यात होणारा माल देखील लांबच्या मार्गाने निर्यात करावा लागेल, ज्यामुळे निर्यातीचा खर्च वाढेल. याचा एकंदरीत फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.