Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पादुका पूजन व अभिषेक संपन्न!

संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज पहाटे (शनिवार ता.२१) काशी विद्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांचे हस्ते विधिवत पादुका पूजन व महाअभिषेक संपन्न झाला.
यावेळी आचार्यांनी मंत्र घोष केला. वारकरी व संतांचे साक्षीने सोहळा संपन्न झाला. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने हरड महाराजांना सन्मानित करण्यात आले.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे. अँड. बबनराव वाबळे, पांडुरंग महाराज डुंबरे यावेळी उपस्थित होते. नामदेव महाराज हरड समाजाच्या हितासाठी निष्काम किर्तन सेवा करत आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून सांप्रदायिक भाविक भक्तांना योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत.
गेली ३८ वर्षांपासून पंढरपूर वारी करत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संत संमेलने यशस्वी केली आहेत.यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मोरे महाराज यांना आंतरराष्ट्रीय संत संमेलन प्रसंगी विश्व सन्मान देण्याचे हरड यांनी जाहीर केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात पोहोचली
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल पुण्यातील भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात होता. याठिकाणी पालखी पोहचताच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.