विवाहितेवर सामूहिक अत्याचार; चाैघांनी घरात उचलून नेलं अन्..

एका विवाहितेवर (वय १८) चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार केडगाव उपनगरात बुधवारी (ता. १८) सकाळी घडला. पीडित विवाहितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहेत.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता आपल्या घरी पाण्याची मोटार लावत असताना, चार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून तिच्या घरासमोर आले. यातील एक संशयित आरोपीने विवाहितेच्या दिशेने धाव घेत तिला उचलून घरात घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर इतर तिघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे जबाबात म्हटले आहे.
संशयितांनी लाल रंगाच्या टोप्या, मेहंदी रंगाचे मास्क व विविध रंगांचे कपडे परिधान केले होते. सर्व संशयित आरोपी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचे असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, व तेजश्री थोरात यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेच तपासण्यात आले आहेत. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांकडून तपासाच्या दृष्टीने माहिती घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.