क्राईम

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या दोन जीवांना संपवण्याचं पाप आईनेच केले,रसगुल्लामध्ये विष भरले अन्..


अरहान आणि इनाया…अरहान ५ वर्षाचा तर त्याची बहीण इनायाचे वय १ वर्ष, दोघेही चिमुकले एकमेकांचा हात पकडून घराबाहेर खेळायचे. या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून कुणीही त्यांचे दु:ख सहज विसरून जाईल.

परंतु या दोन कोवळ्या जीवांना काय माहिती होते, ज्याने त्यांना जन्म दिला ती आईच त्यांच्या मृत्यूचे कारण बनेल. आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या या दोन जीवांना संपवण्याचं पाप आईनेच केले आहे.

 

१९ जून २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास पश्चिमी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये रुडकली तालाब अली या गावात एका घराबाहेर अजब गोंधळ दिसून आला. हे घर होते वसीम आणि त्याची पत्नी मुस्कान हिचे. बाहेर लोकांची गर्दी होती. घराच्या आतमध्ये खाटीवर २ मुलांचा मृतदेह होता. अरहान आणि इनाया हे जग सोडून गेले होते. आई धाय मोकलून रडत होती. सकाळी नाश्ता करून मुले झोपी गेली की परत उठलीच नाहीत.

 

मुलांचे वडील कामासाठी चंदीगडला गेले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुलांच्या मृत्यूचा तपास सुरू केला.

 

 

आई मुस्कानची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की, सकाळी मुलांना चहा बिस्किट आणि फरसाण खायला दिले. नाश्ता केल्यानंतर दोन्ही मुले झोपी गेले. काही वेळाने मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठलेच नाहीत. त्यांचा श्वास बंद झाला होता. या दोन्ही मुलांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत. प्राथमिक तपासात एखादा विषारी पदार्थ खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्याची तयारी केली परंतु आई मुस्काने त्यास नकार दिला. जेव्हा मुस्कानला विचारले तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. मग तिथेच पोलिसांच्या मनात शंका उपस्थित झाली.

 

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले. मुस्कानने सांगितलेला प्रकार ऐकून पोलीस अधिकारी हैराण झाले. या दोन मुलांचा जीव इतर कुणी नाही तर आई मुस्काननेच रसगुल्लामध्ये विष टाकून मुलांना खायला दिले आणि मारून टाकले होते. मुस्कानचे तिच्या आत्याच्या मुलासोबत अफेअर सुरू होते. जुनैद मुजफ्फरनगरच्या फिरोजाबाद परिसरात राहणारा आहे. काही वर्षापूर्वी मुस्कानचे लग्न वसीमसोबत झाले होते. त्या दोघांना अरहान आणि इनाया नावाची मुले होती. वसीम वेल्डिंगचे काम करत होता, त्यामुळे कामासाठी त्याला बऱ्याचदा बाहेर जायला लागायचे. जवळपास ३ वर्षाआधी मुस्कान आणि जुनैद पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले. या दोघांमध्ये जवळीक वाढली.

 

निकाहसाठी जुनैदने ठेवली अट

जुनैद आणि मुस्कान दोघे पळून गेले होते. या दोघांना नातेवाईकांनी शोधले. मुलांकडे पाहून वसीमने मुस्कानला माफ केले परंतु कहाणी इथेच संपली नाही. वसीम जेव्हा बाहेर जायचा मुस्कान जुनैदला भेटायला बोलवायची. दोघांमध्ये अनैतिक संबंध इतके वाढले की दोघांनी निकाह करण्याचा निर्णय घेतला. निकाहनंतर हनीमूनला जाण्याचाही प्लॅन बनवला. परंतु निकाहसाठी जुनैदने एक अट ठेवली ती म्हणजे वसीमच्या दोन्ही मुलांना तो सांभाळणार नाही. मुस्कानला कुठल्याही किंमतीत जुनैदसोबत निकाह करायचा होता त्यामुळे तिने मुलांचा काटा काढण्याचा कट रचला. १९ जूनला वसीम कामानिमित्त बाहेर गेला तेव्हा तिने रसगुल्लामध्ये मुलांना विष घालून खायला दिले. त्यानंतर या दोन्ही निष्पाप मुलांचा जीव गेला. सध्या पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेतले असून तिचा प्रियकर जुनैद हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button