बीडला पावसाचा तडाखा; दुरुस्त केलेला पूल एक तासातच गेला वाहून

बीड: आहिल्यानगर-आष्टी-जामखेड या राज्य महामार्गावरील कडया गावाजवळील शेरी येथे उभारलेला तात्पुरता मातीचा पूल काल पुन्हा वाहून गेला आहे. अवघ्या एका तासाच्या पावसात पूल वाहून गेल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांना तब्बल 10 किमीचा वळसा घालावा लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. कडया येथील पुलाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात मातीचा पूल बांधण्यात आला होता.
मात्र काल पडलेल्या मुसळधार पावसाने तो अक्षरशः एक तासात वाहून नेला. हे दुसऱ्यांदा घडत असून, याआधीही काही दिवसांपूर्वी पूल वाहून गेला होता. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी पुन्हा तात्पुरता बंदोबस्त करून वेळ मारून नेल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची वाहतूक ठप्प झाली आहे, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर पक्का पूल बांधून देण्याची मागणी केली आहे.