आश्रमात जायची मुलगी, विद्यार्थीनीवर तीन दिवस अत्याचार, स्वामीला अटक, मठात सापडले काय ?

अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर तीन दिवस अत्याचार केल्या प्रकरणी एका मठाच्या स्वामीला अटक करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग तालुक्यात हा प्रकार घडला आहे. मेखळी गावातील राम मंदिर मठातील लोकेश्वर स्वामीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुडलगी पोलीस ठाण्यात स्वामीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्वामीला अटक करून हिंडगला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पीडित मुलगी आणि तिचे वडील हे आश्रमाचे भक्त होते. दोन वर्षांपासून ते नियमित आश्रमात जायचे. पीडित मुलगी तिच्या मामाच्या गावाहून घरी येत असताना कारमधून जाणाऱ्या लोकेश्वर स्वामीनं तिला मी सोडतो सांगून गाडीत घेतलं.
मुलीला कारमध्ये घेताच लोकेश्वर स्वामीनं तिला धमकावत रायचूर इथल्या लॉजवर नेलं आणि दोन दिवस अत्याचार केले. त्यानंतर बागलकोट इथल्या लॉजवर एक दिवस नेलं आणि तिथं अत्याचारानंतर महालिंगपूर इथं सोडलं. तसंच घडल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केल्यास मारून टाकेन अशी धमकी दिली.
दरम्यान, घरी येताच मुलीनं सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर स्वामीवर गुन्हा दाखल झाला. स्वामीला अटक केल्यानंतर मेकळी गावातील राम मंदिर मठाची झडती घेतली गेली. तेव्हा मठात तलवार, कोयता, जांबिया अशी हत्यारे सापडली.
स्वामीचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. मटक्याचे नंबर आणि जुगाराची माहिती स्वामी भक्तांना द्यायचा. त्यामुळे बेळगावसह इतर जिल्ह्यातले लोकही स्वामीकडे येत असतं. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतरही याआधी कारवाई झाली नव्हती. आता एका मुलीवर अत्याचारानंतर स्वामीला अटक कऱण्यात आलीय.