ताज्या बातम्या

ना कोणी आले, ना गेले ! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात ‘चमत्कार’; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला


के रळच्या ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिरात एक चमत्कार घडला आहे. सोन्याची एक काठी गहाळ झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता ही कांडी रहस्यमयीरित्या मंदिराच्या भांडारातच सापडली आहे.

हा सोन्याचा रॉड मंदिराच्या परिसरातच रेतीच्या खाली पुरलेला सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याचे दागिने ठेवलेली खोली नाही कोणी उघडली होती ना ही कोणी सीसीटीव्हीत आत-बाहेर जाताना दिसला आहे. यामुळे ही चमत्कारीक घटना मानली जात आहे.

 

सोन्याची काठी गहाळ झाल्याने पोलिसांना बोलविण्यात आले होते. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वान या काठीचा माग घेत रेती असलेल्या भागात आले, तिथे ती पुरलेल्या अवस्थेत सापडली. यामुळे ती कोणी ठेवली, चोरण्याचा प्रयत्न झाला का हे पाहण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधले, परंतू कोणीच त्यात दिसले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

भक्तांनी याला देवाचा चमत्कार मानले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजांची दुरुस्ती सुरु होती. यावेळी दरवाजात जडलेल्या सोन्यापासून १२ सेमी लांबीचा रॉड बनविला होता. याद्वारे दरवाजावरील सोन्याच्या प्लेट वेल्ड केल्या जाणार होत्या. २७ एप्रिलला काम सुरु झाले. त्यानंतर ३० एप्रिलला काम पूर्ण झाल्यावर मंदिर प्रशासनाने सर्व सोन्याच्या वस्तू एका कापडी पिशवीत घालून स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या. ३ मे रोजी पाहिले असता त्या पिशवीतून सोन्याचा रॉड गायब झाला होता. ३० एप्रिल नंतर मधल्या काळात स्ट्राँग रुम उघडण्यात आली नव्हती. यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली, तर त्यातही कोणी आल्याचे किंवा गेल्याचे दिसले नाही. तसेच रुमचे टाळे देखील व्यवस्थित होते.

 

पोलीस आता रॉड रेतीत सापडला असला तरी कारवाई करणार आहेत. तपासही केला जात आहे. मंदिराचे सोने ठेवण्याची ज्या लोकांवर जबाबदारी आहे त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यांच्यापैकीच कोणीतरी ही रॉड लंपास केली असेल व चोरी पकडली जाईल म्हणून घाबरून रेतीत पुरण्यात आली असेल असा संशय पोलिसांना आहे. तसेच ही घटना निष्काळजीपणाची होती की नियोजित चोरीचा प्रयत्न होता हे पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button