मेहुणीसोबत अनैतिक संबंध, घरच्यांचा विरोध, रात्री एकठ्यात धरलं; अन संपवलं …

पु णे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा दोन नराधमांनी खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
ही घटना शुक्रवारी ९ मे रोजी रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे घडली आहे. हत्या झालेला व्यक्ती हा घरी जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात गाठून त्याचा खून केला. खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत इस्टेट एजंटचं नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा, नंतर त्याने टूरिस्टचा व्यवसाय सुरु केला होता. मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता. यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहर यांना रस्त्यात गाठलं.
तेथे ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर आधी त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करण्यात आली. बांबूचा वार डोक्यावर वर्मी लागल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराईमधून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.