ताज्या बातम्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला,मोदींचे मोठे वक्तव्य ..


स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. राष्ट्राला सलग ११ व्यांदा संबोधीत करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत, समृद्ध भारत हे आपलं लक्ष्य असल्याचे सांगितले.



जाणून घ्या पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे १० मुद्दे…

समान नागरी संहितेवर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले, ‘आपल्या देशात समान नागरी संहितेची चर्चा सुरू आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालयही आम्हाला समान नागरी संहिता मागत आहे आणि हे देशाच्या संविधान निर्मात्यांचेही स्वप्न होते. जे कायदे धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करतात, ज्यामुळे भेदभाव होतो, अशा कायद्यांना देशात स्थान असू शकत नाही. सांप्रदायिक नागरी संहितेत आपण ७५ वर्षे घालवली आहेत. आता आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे.

स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना नमन

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान मोदी यांनी अभिवादन केले. ते म्हणाले की, आज तो शुभ क्षण आहे जेव्हा आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, फाशी चढणाऱ्या आणि भारत मातेच्या अगणित सुपुत्रांना ‘भारत माता की जय’चा नारा लावणाऱ्यांचे स्मरण करतो. स्वातंत्र्यप्रेमींनी आज स्वातंत्र्याच्या या उत्सवात स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी दिली. अशा प्रत्येक महापुरुषाबद्दल आम्ही आदर व्यक्त करतो. आज राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्र उभारणीसाठी पूर्ण समर्पणाने आणि कटिबद्धतेने देशाचे रक्षण करणारे महापुरुषही देशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

४० कोटी भारतीयांनी महासत्तेचा पराभव केला, आज आपण 140 कोटी आहोत

यावेळी मोदी म्हणाले, ‘आजचा दिवस म्हणजे शुभ मुहूर्त आहे. जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली अर्पण करत असतो. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक देशवासियांबद्दल आम्ही आदर व्यक्त करतो. जेव्हा आम्ही ४० कोटी होतो तेव्हा आम्ही महासत्तेला पराभूत केले, आज आम्ही १४० कोटी आहोत, असे मोदी म्हणाले.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय

‘१० वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुण आता हळूहळू पुढे जाण्याचा हेतू बाळगत नाहीत, तर मोठी झेप घेत आहेत. भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे. ही संधी आपण हातातून जाऊ देऊ नये. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. २०४७ पर्यंत विकसित भारताचे आमचे ध्येय आहे.

‘विकसित भारत २०४७’ मध्ये प्रत्येक भारतीयाच स्वप्न प्रत्यक्षात आणणार

‘विकसित भारत २०४७’ फक्त शब्द नाही, यामागे प्रचंड मेहनत सुरू आहे. प्रत्येक देशवासीयाची स्वप्ने त्यात प्रतिबिंबित होत आहेत. तरूण असोत, वृद्ध असोत, गावातील लोक असोत, शहरवासी असोत, शेतकरी असोत, आदिवासी असोत, दलित असोत, महिला असोत, प्रत्येकाची स्वप्ने ‘विकसित भारत २०४७’मध्ये असतील. त्यावेळी देश विकसित भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. यासाठी कुणी कौशल्य भांडवल तयार करण्याचा सल्ला दिला, कुणी भारताला उत्पादन केंद्र बनवण्याचा सल्ला दिला, कुणी विद्यापीठे जागतिक बनवण्याची सूचना केली आहे. आपली कौशल्ये ही तरुण जगाची पहिली पसंती बनली पाहिजे, असे मोदी म्हणाले.

‘वोकल फॉर लोकल’ हा अर्थव्यवस्थेचा नवा मंत्र

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही ‘वोकल फॉर लोकल’चा मंत्र दिला. आज मला आनंद होत आहे की व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटू लागला आहे. आता एक जिल्हा एक उत्पादन असे वातावरण तयार केले जात आहे.

स्पष्ट हेतू आणि चांगल्या धोरणांमुळे देशाचा विकास

जेव्हा धोरण योग्य असते आणि हेतू चांगला असतो, तेव्हा निश्चित परिणाम मिळतात. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. विकासात झेप घेणाऱ्या दोन गोष्टी आहेत. प्रथम आधुनिक पायाभूत सुविधा आहे आणि दुसरीकडे सामान्य जनतेचे अडथळे दूर करण्यावरही भर देण्यात आला आहे. गेल्या दशकात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास झाला आहे. प्रत्येक गावात शाळा, रस्ते, बंदरे, रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालय, आयुष्मान आरोग्य मंदिर, अमृत सरोवर, असे अनेक विकासाची काम केली. चार कोटी गरीब लोकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आर्मी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करते तेव्हा अभिमान वाटतो

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘एकेकाळी दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरलेला भारत आता शूर आणि बलवान झाला आहे. दहशतवादी आपल्या देशात येऊन आपल्या जवानांना ठार मारून निघून जायचे. मात्र आता दहशतवाद्यांविरोधात देशाचे सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते, जेव्हा देशाचे सैन्य हवाई हल्ले करते, तेव्हा अभिमान वाटतो.

वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढणार

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देशाबाहेर जावे लागते. येणाऱ्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढवण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राक्षसी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, ‘महिलांविरुद्ध राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात या घटनेचा प्रत्यक्ष कुठेही उल्लेख केला नाही.

थोडक्यात महत्वाचे

ध्वजारोहण करताना अलका चंद्रकांत सातपुते महिला सरपंच साकेगाव

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button