लोकशाही विश्लेषण

प्रिन्सेस डायना-परिकथेतील राजकुमारीचा अपघाती मृत्यू की हत्या; नेमक काय घडले होते?


Diana, Princess of Wales रविवारी, ३१ ऑगस्ट १९९७ रोजी पहाटेच्या सुमारास प्रिन्सेस डायनाचा पॅरिस, फ्रान्समधील पाँट डे ल’आल्मा बोगद्यातील कार अपघातात मृत्यू झाला. तिच्याबरोबर कारमध्ये तिचा प्रियकर डोडी अल फायद होता; कारचा चालक-हेन्री पॉल; आणि अंगरक्षक ट्रेवर रीस-जोन्सही होते.



 

ट्रेवर रीस-जोन्स हा या अपघातात वाचणारा एकमेव होता. हा खरोखरंच अपघात होता का? काय घडले नेमके त्या दिवशी? हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न!

 

परिकथेतील राजकुमारी

 

ही राजकुमारी आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. एखाद्या परिकथेत शोभावे असे तिचे आरसपाणी सौंदर्य! जन्मजात ती राजकुमारी नव्हतीच. एका मोठ्या देशाच्या राजकुमाराशी विवाह झाला आणि तिच्या नशिबी राजकुमारी होणं आलं. आता हे सुदैव म्हणावं की, दुर्दैव हे तीच नशीबच ठरवणार होतं. अज्ञात असलेल्या या सौंदर्यवतीवर जगाचे लक्ष गेलं ते तिच्याच विवाहाच्या दिवशी, तेही साहजिकच होतं. तिचा विवाह इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सशी होत होता. १९८१ साली झालेल्या या विवाह सोहळ्यातून या वधूकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं, तिचं नाव होतं डायना स्पिनर.

 

 (सौजन्य: विकिपीडिया)

 

स्वप्नवत… आणि नंतर घटस्फोट!

 

चार्ल्स आणि डायना यांच्या लग्नाचे टीव्हीवर लाईव्ह प्रसारण झाले होते. या नंतर जे सुरु झाले त्याला म्हणतात, पापराझींचा खेळ. या नव्या राजकुमारीची एक झलक घेण्यासाठी पापराझी नेहमीच तिच्या पाळतीवर असायचे. ९० च्या दशकापर्यंत डायनाचा एक फोटो ८० लाख रुपयांना विकला जात होता. हे सारे स्वप्नवत असले तरी डायनाच्या नशिबी मात्र प्रतारणा आली. तिच्या राजकुमाराचे एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं होत. शेवटी घडायचं तेच झालं. १९९६ साली दोघांचाही घटस्फोट झाला. ब्रिटनमधल्या सगळ्यात ताकदवान घराण्यात हे घडत होतं. यानंतर पत्रकारांचा ससेमिरा नेहमीच डायनाच्या मागे असायचा. डायना जिथे जाईल तेथे पत्रकार तिच्या मागावर असत. तिच्या एका फोटोनेही, एखादा पापराझी कोट्यधीश होऊ शकेल अशी स्थिती होती.

 

 डायना आणि चार्ल्स (सौजन्य: विकिपीडिया)

 

तो फोटो ५० कोटींना विकला गेला

 

१९९७ साली डायनाचा आणखी एक फोटो समोर आला. या फोटोत डायना ही एका यार्डवर बसली होती. तिच्याबरोबर डोडी फायद होता. इजिप्तचे अरबपती व्यावसायिक मोहम्मद अल फायद यांचा हा मुलगा. तो स्वतः सिने-निर्माता होता. त्याचवर्षी ऑगस्ट महिन्यात डायना आणि डोडी सुट्टीसाठी इटलीला गेले. तेथेच हा फोटो टिपण्यात आला होता. विशेष म्हणजे हा फोटो तब्बल ५० कोटी रुपयांना विकला गेला. त्यानंतर त्यांच्या संबंधांविषयी वर्तमानपत्रांचे मथळे रंगू लागले. त्याच वेळी डोडी यांचा एका मॉडेल्सशी साखरपुडा झाल्याचा दावा त्या मॉडेलनेच केला. त्यामुळे तत्कालीन मीडियाला चांगलाच मसाला मिळाला होता. डायनाचा पाठलाग करण्यासाठी आणखी एक कारण मिळालं होतं. त्याचाच परिणाम पुढे डायनाला भोगावा लागणार होता.

 डायना (सौजन्य: विकिपीडिया)

डायना आणि डोडी यांचे संबंध उघड झाल्यामुळे १९९७ साली सगळे पापराझी डायनाच्या मागे होते. ३० ऑगस्ट १९९७ शनिवारचा दिवस होता डायना आणि डोडी हे इटालीवरून फ्रान्ससाठी रवाना झाले. पुढे इंग्लंडला जाण्याचा प्लान होता. परंतु त्यांनी काही काळ त्यांनी पॅरिसमध्ये घालवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वी १० दिवस इटलीमध्ये डायना आणि डोडी यांनी मोहम्मद अल फायद यांच्या मालकीच्या जोनिकल यार्डवर एकत्र घालवले होते. त्यानंतर ३० ऑगस्ट १९९७ रोजी सार्डिनियाहून पॅरिसला जाण्यासाठी उड्डाण केले होते. ३१ ऑगस्ट १९९७ रोजी डायना लंडनला परतणार होती. जिथे तिची भेट तिच्या दोन्ही मुलांशी म्हणजेच प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्याशी होणार होती. ३० ऑगस्ट रोजी डायना आणि डोडी हे दुपारी ३ च्या सुमारास पॅरिसला पोहोचले आणि विमानतळावरून व्हिला विंडसर येथे गेले (ड्यूक आणि डचेस ऑफ विंडसर यांचे पूर्वीचे घर मोहम्मद अल फायदने खरेदी केले होते). तिथून ते फायद कुटुंबाच्या मालकीच्या रिट्झ पॅरिसला गेले. यावेळी राजकुमारी डायनाने आपल्या मुलांशी फोनवर संवाद साधला होता.

 

रिट्झमध्ये असताना, डोडीने प्लेस वेंडोममधील रेपोसी दागिन्यांच्या दुकानाला भेट दिली होती. विशेष म्हणजे ही भेट त्याने एकट्याने दिली होती आणि दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास ते रिट्झमधून रुए आर्सेन हौसे येथील डोडीच्या अपार्टमेंटसाठी निघाले. या जोडप्याने रात्री ९:३० च्या सुमारास चेझ बेनोइट येथे रात्रीचे जेवण घेण्याचा प्लान आखला होता, परंतु पापाराझींमुळे ते रिट्झमध्येच परत आले. त्यांनी प्रथम L’Espadon रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा प्लान केला होता, परंतु १० मिनिटांनंतर इम्पीरियल स्वीटमध्ये खाजगी जेवणासाठी गेले. एकूणच पापराझींना टाळण्यासाठी त्यांनी मध्यरात्रीनंतर डोडीच्या अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला.

 

मध्यरात्रीनंतर जीवघेणा खेळ सुरु झाला…

 

रिट्झ सुरक्षा प्रमुख हेन्री पॉल यांनी त्यांना मागच्या दाराने बाहेर काढत मर्सिडीज S280 कारमध्ये बसवले, हाच या कारचा चालकही होता. (शवविच्छेदन रिपोर्टनुसार पॉल दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले.) ते रात्री १२.२० च्या सुमारास निघाले. कारमध्ये, प्रिन्सेस डायना किंवा डोडी दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता; प्रवासी सीटवर बसलेल्या रीस-जोन्सने फक्त सीट बेल्ट लावला होता. हे जोडपे मागच्या दाराने बाहेर पडले तरी त्याची खबर पापराझींना लागली होती. काहीजण मोटारसायकल घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले. यामुळे हेन्री पॉल याने गाडीचा वेग वाढवला. रात्री १२.२५ च्या सुमारास गाडी धोकादायकरीत्या वेगाने पोंट डे ल’आल्मा बोगद्यात घुसली. AP ने रिपोर्ट दिल्याप्रमाणे, “कारने बोगद्यात प्रवेश केल्यानंतर काही सेकंदांनंतर, ती नियंत्रणाबाहेर गेली, बोगद्याला विभाजित करणाऱ्या १३ व्या काँक्रीटच्या खांबावर जाऊन धडकली, आणि उलटून काही काळ एकाच जागेवर फिरत राहिली. सिनेमात दिसते असे दृश्य असले तरी त्याचवेळेस काळाने डाव साधला होता.

 

घटनास्थळी नेमके काय घडले?

 

अपघात झाला त्याच वेळी, एक फ्रेंच डॉक्टर डॉ. फ्रेडरिक मेलिझ बोगद्यातून गाडी चालवत होते. अपघाताचे साक्षीदार असल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीत चार लोकांना पाहिले. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी होते. जिवंत असलेल्यांपैकी पुरुष प्रवासी हा श्वास घेत होता तर महिलेला श्वास घेण्यास अडचण येत होती. तिला त्वरित मदतीची गरज होती. त्यांनी लगेचच फोनवरून मदत बोलावली. १२.२७ च्या सुमारास अग्निशमन दलाला मदतीसाठी कॉल आला होता. पोलीस आणि अग्निशमन दल १२.४० ला घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी ड्रायव्हर, हेन्री पॉल आणि डोडी दोघेही घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. प्रिन्सेस डायनाला पिटिए-साल्पेट्रीयर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी नंतर साक्ष दिली की, अशा स्थितीतही पापराझींनी फोटो काढणे सुरूच ठेवले होते. पोलिसांनी सात छायाचित्रकारांना ताब्यात घेतले होते. घटनास्थळी असलेले अग्निशमन दलाचे सार्जंट झेवियर गौरमेलोन म्हणाले की, राजकुमारी डायनाचे शेवटचे शब्द “माय गॉड, काय झाले?” हे होते. जेव्हा प्रिन्सेस डायनाला कारच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला. प्रथम उपस्थितांनी तिला सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल केले. CNN दिलेल्या त्यावेळच्या वृत्तानुसार, “रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी तिला पुन्हा जिवंत करण्यात यश मिळवले होते, परंतु रुग्णालयात पोहोचल्यावर तिच्या हृदयाची धडधड थांबली असे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. ब्रुनो रिओ यांनी सांगितले. सर्जनांनी अथक प्रयत्न केले तरी त्यांना तिला वाचवण्यात यश आले नाही.

 

३१ ऑगस्ट १९९७ रोजी पॅरिसमध्ये पहाटे ४ वाजता राजकुमारी डायना यांना मृत घोषित करण्यात आले; तेव्हा ती फक्त ३६ वर्षांची होती. सकाळी ६ वाजता, पिटिए-साल्पेट्रीयर हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अलेन पावी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि वेल्सच्या राजकुमारीच्या मृत्यूची घोषणा केली. फ्रान्समधील ब्रिटीश राजदूत मायकल हे तेथे होते. ते म्हणाले, “प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या मृत्यूने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे.” डायनाच्या बहिणी, लेडी साराह मॅककॉर्कोडेल आणि लेडी जेन फेलोजसह पॅरिसला तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. प्रिन्सेस डायनाचे अंत्यसंस्कार ६ सप्टेंबर १९९७ रोजी झाले. तिच्या मृत्यूने सारं इंग्लंड गहिवरलं होतं. या दिवशी केन्सिंग्टन पॅलेस गार्डनमध्ये १५ टन फुलं- जवळपास सहा कोटी गुलाबांच्या फुलांचा ढीग जमला होता. ही फुलं कुठल्याही सोहळ्यासाठी नव्हती तर ब्रिटनच्या राजकुमारिच्या मृत्यूच्या वार्तेनंतर लोकांनी प्रेमापोटी तिला वाहिलेली श्रद्धांजली होती.

 

 शेवटचा निरोप (सौजन्य: विकिपीडिया)

डायनाचा अपघात होता? की हत्या?

डायनाच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनीही डायना हीचा मृत्यू अपघाती होता की हत्या, यावरून चर्चा होते आणि वेगवेगळ्या थियरीज सांगितल्या जातात. यामागे कारणही तसेच आहे. सर्वात आधी डायनाच्या मृत्यूसाठी मीडियाला कारणीभूत ठरवलं गेलं. इंग्लंडमधल्या लोकांनी काही काळासाठी वृत्तपत्र खरेदी करणंही सोडून दिलं होतं. त्यानंतर आरोपी म्हणून ब्रिटनच्या राजघराण्यालाच दोषी ठरवण्यात आलं. १९९५ साली डायनाने दिलेल्या एका मुलाखतीत राजघराणं मला हटवण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगितलं होतं. प्रिन्स चार्ल्स बरोबर घटस्फोट झाल्यावर तिने एका नोंदीमध्ये म्हटलं होतं की, कोणीतरी माझ्या अपघाताचा कट रचत आहे. कदाचित माझ्या गाडीचा ब्रेक फेल होऊ शकतो. त्यानंतरच चार्ल्सच्या लग्नाचा रस्ता मोकळा होऊ शकतो. त्यामुळे राजघराण्यावरील संशय अधिकच बळावला.

राजघराण्याविरुद्ध नाराजी

चार्ल्स घटस्फोटानंतर दुसरं लग्न करू शकत होते. परंतु ब्रिटनच्या जनतेची पूर्ण सहानभूती डायनाच्या मागे होती. तिच्या मृत्यूनंतर ब्रिटनची जनता राजघराण्याविरुद्ध नाराज होती. याशिवाय अपघात झाल्यानंतर डायनाच्या कारवर दुसऱ्या गाडीच्या घासण्याचे निशाण होते. डोडीच्या वडिलांनी एका फ्रेंच पापाराझीने डायना आणि डोडीच्या कारला टक्कर दिल्याचे सांगितले. परंतु त्या पापाराझीला पकडण्यापूर्वी त्याचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे हा अपघात अधिकच संशयाचा भोवऱ्यात अडकला. विशेष म्हणजे तिथे असलेल्या एकही सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात रेकॉर्ड झाला नव्हता. नंतर झालेल्या पडताळणीत पापराझींना यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं. त्यामुळे त्या रात्री नेमकं काय झालं याविषयी आजही तितकीच गूढता आहे.

 

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button