बीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

Beed News : ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचं कार्यालय फोडलं


शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.



या दगडफेकीत कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचे बोललं जात आहे. बीड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीदरम्यानची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिप शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या आवाजात आहे. कुंडलिक खांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांना सहकार्य केल्याची कबुलीची एक कथित ऑडिओ क्लिप मधून समोर आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यानंतर लागलीच कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. आता या घटनेमुळे बीड शहरातील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आपण बप्पाचंच काम केलं…

कुंडलिक खांडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप गुरुवारी सकाळी व्हायरल झाली होती. त्यानंतर जालना रोडवरील कार्यालयात अज्ञात नागरिकांनी तोडफोड केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीचा ज्येष्ठ पदाधिकारीचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. ‘आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली. विधानसभेला ओबीसी मते मिळविण्यासाठी मला ते आवश्यक होते, पण आपण बप्पाचेच काम केलं आहे. सगळी यंत्रणा त्यांना दिली आणि पैसेही पुरवले. विशेष म्हणजे यात संबंधित पदाधिकारी आपण विश्वासघात केल्याचे कबूल देखील करत आहे. तर दुसऱ्या ऑडिओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करत असल्याचे समजते. आपण आपल्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो’, असेही संभाषण आहे. इतकंच नाही तर कथित पदाधिकारी महायुतीतील मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट रचत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगड पडले तर आपले मतदान वाढेल, असेही भाष्य या क्लिपमध्ये आहे. सदर ऑडिओ क्लिप ही लोकसभा निवडणुकीपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्ही पुरावे पोलिसांच्या हाती..

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय अज्ञात लोकांनी फोडले आहे. या संदर्भात सीसीटीव्हीचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शी काही लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून पोलिस हल्लेखोरांपर्यंत लवकरच पोहोचतील. या तोडफोडीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button