क्राईममहाराष्ट्र

Jalgaon crime : मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेला विहिरीत फेकले, रात्र काढली विहिरीत


Jalgaon crime: जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेला विहिरीत ढकलून दिल्याची घटना आज २५ जून रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे उघडकीस आली. सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली. दीपिका दीपक पाटील (वय २६, रा. नेहरूनगर)असे सदर महिलेचे नाव असून गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. या घटनेचा एमआयडीसी पोलीस स्टेशन कसून तपास करीत आहेत.जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात पती,मुलांसह वास्तव्यास असलेली दीपिका पाटील या दि. २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान रस्त्याने तिला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे घेऊन गेली. त्या महिलेने तिच्या डोक्यावरून हात फिरविल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्यानंतर तास-दीड तासाने महिलेला गुंगीत असताना जाणवले की, ती पाण्यात असून एका विहिरीत आहे.

मात्र गुंगी असल्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती. यामुळे सोमवारची पूर्ण रात्र विहिरीत सदर महिलेने काढली. दुसरीकडे शाळेत सदर मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे.(केसीएन) मग तिच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली प्र.न.येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.

त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले.गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान सदर महिलेला गुंगवून विहिरीत टाकून देणारी ती महिला कोण आहे ? तिचा हेतू नेमका काय होता ? याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन शोध घेत आहेत. घटना मार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button