एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, ‘नाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्यावर नाच

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पणजी : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळताना दिसत आहे.

कारण महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे. बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे आज गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांसोबत आज राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.

एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते.