
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.
बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय, अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. य़ाच दरम्यान गुवाहाटीत हॉटेलमधील दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये मारामारीची घटना खोटी असल्याचं आता समोर आलं आहे. आमदार प्रकाश आबिटकरांनी (Prakash Abitkar) याबाबत खुलासा केला असून कुणीतरी खोडसाळपणे हे वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “मी एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गुवाहाटीत असलेल्या आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी पाहिली होती. या बातमीत माझ्याही नावाचा उल्लेख होता. अशा पद्धतीची कोणतीही घटना या हॉटेलमध्ये घ़डलेली नाही. या सर्व गोष्टी संपूर्णत: अफवा आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका” असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.