
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती मीळत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, भाजपने आमचा कोणताही संबंध नाही असं वारंवार सांगितलं. मात्र, आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुवाहाटीतील आमदारांना विश्वास देण्यासाठी बोलल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. शनिवारी रात्री जवळपास 15 आमदार फडणवीस यांच्याशी बोलले, असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांची चौथ्यांदा दिल्लीवारी आहे.