त्यांनी आईला सोडलं, तिथं फडणवीसांना काय साथ देणार?- संजय राऊत

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सेनेच्या सामना वृत्तपत्रातून बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील बंडखोरांवर ट्विटव्दारे निशाणा साधलाय.

राऊतांनी ‘रोखठोक’मधून म्हटलंय, एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? असा सवाल करण्यात आलाय. शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व श्री. शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे श्री. शिंदे यांनीच उघड केले. भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली. सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमानानं आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.

दुसरं महत्त्वाचं, बिऱ्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सुरतच्या भूमीवर असा कोणता मंत्र या आमदारांना देण्यात आला? जे आमदार नंतर गुवाहाटीला गेले, त्यांनाही ‘व्हाया’ सुरत जावे लागले. हा संशोधनाचा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड केले व त्यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांचे समर्थन मिळाले. नारायण राणे व छगन भुजबळ यांनाही त्यांच्या बंडात आमदारांचे इतके समर्थन मिळाले नव्हते. छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती, पण ग्रामीण भागात शिवसेना फोफावत होती. भुजबळांचे बंड हे मनोहर जोशींविरुद्ध होते व भुजबळांना मोठ्या प्रमाणात लोकांची सहानुभूती असूनही स्वतः भुजबळ माझगाव विधानसभेत निवडणूक हरले व त्यांच्याबरोबर गेलेल्या बहुतेक सर्व आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला. अनेकांची राजकीय कारकीर्दच संपली. याचीही आठवण सामनामधून करुन देण्यात आली आहे.

त्यांनी आईला सोडलं, तिथं फडणवीसांना काय साथ देणार?
महाराष्ट्रात आजही ठाकरे कुटुंबाविषयी कमालीची आस्था व कृतज्ञता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे. बाळासाहेबांचा आत्मा ज्यांनी दुखावला त्यांचे राजकीय श्राद्धच महाराष्ट्रात घातले गेले. 22 जूनला संध्याकाळी श्री. उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक भावनाविवश भाषण केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत अश्रुधारा वाहिल्या. सांजवेळी श्री. ठाकरे व त्यांच्या कुटुंबाने ‘वर्षा’ बंगल्यातून सामान आवरून ‘मातोश्री’कडे प्रस्थान केले तेव्हा रस्त्यात ठाकरेंच्या मानवंदनेसाठी दुतर्फा गर्दी होती. सांजवेळी बाळासाहेबांच्या मुलास घर सोडावे लागले याचा प्रचंड संताप लोकांत, खासकरून महिलावर्गात होता. त्या एका घटनेने महाराष्ट्र हेलावला. अश्रूंत मोठी ताकद असते हे येणारा काळच सिद्ध करील! या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फुटिरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. या सर्व आमदारांची भूक मोठी आहे. त्यांनी आईला सोडले तेथे फडणवीसांना काय साथ देणार? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय.