रिलायन्स ज्वेल्सवर १४ कोटींचा दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने लुटले, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले
सांगली:सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी भरदिवसा गोळीबार करीत दरोडा टाकण्यात आला.
आठ ते दहा दरोडेखोरांनी शोरूममधील कर्मचाऱ्यांचे हातपाय, तोंड बांधून १४ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. धावपळीत एक ग्राहक जखमी झाला. या दरोड्याने खळबळ उडाली आहे.
मार्केट यार्डजवळ वसंत काॅलनीत रिलायन्स ज्वेल्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर एका वाहनातून आले. पोलिस असल्याचे सांगत ते शोरूममध्ये शिरले. शोरूम व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी जमा केले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांचे हात, पाय, तोंड चिकटपट्टीने बांधले. शोरूममधील दोघांना शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने बॅगेत भरण्यास सांगितले. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत त्यांनी संपूर्ण शोरूम खाली केले. दरोड्याचा हा प्रकार सुरू असतानाच एक ग्राहक शोरूममध्ये आला. त्याने आतील दरोड्याची घटना पाहताच त्याने आरडाओरडा सुरू केला.
दरोडेखोरांनी आतूनच त्याला धमकाविले. तो पळून जात असताना रेलिंगवरून पडून जखमी झाला. ग्राहकाने आरडाओरडा केल्याने नागरिकांची गर्दी होईल, या भीतीने दरोडेखोरांनी दागिन्यांनी भरलेल्या बॅगा घेऊन जाताना काचेच्या दरवाजावर गोळीबार केला आणि वाहनातून पलायन केले. घटनास्थळी एक पुंगळी पडलेली होती. शोरूमच्या काचा फुटलेल्या होत्या. शोरूममध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. शोरूमसमोर बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. या दरोड्याचा तपास करताना सोमवारी पोलिसांनी दरोडेखोरांनी वापरलेली दोन वाहने, त्यांचे कपडे आणि दोन रिव्हॉल्व्हर सापडली.
हिऱ्यांचे दागिने वाचले
दरोडेखोऱ्यांनी सोन्या-चांदीसह हिऱ्यांचे दागिनेही बॅगेत भरले होते. पण ग्राहकाने आरडाओरडा केल्याने लोक जमा होतील या भीतीने दरोडेखोर सोन्या-चांदीची बॅग घेऊन पसार झाले. हिऱ्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग मात्र शोरूममध्येच सोडून दिली.
डीव्हीआर मिळाला
शोरूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते. दरोडेखोरांनी व्यवस्थापकांना बंदुकीचा धाक दाखवीत डीव्हीआर काढून घेतला. पण पळून जाताना डीव्हीआर शोरूममध्ये विसरले. पोलिसांनी डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. त्याची मोडतोड झाली आहे.
गोळीबार करून काचेचा दरवाजा फोडला
दरोडेखोरांनी दागिने लुटल्यानंतर शोरूमच्या काचेच्या दरवाजावर गोळी झाडली. यात दरवाजा फुटला. परिसरात काचेचा खच पडला होता. एक पुंगळीही पोलिसांना मिळून आली आहे.