ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू


नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारात बुधवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्लात साडेतीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाणाऱ्या वन विभागाच्या गस्ती वाहनाला अपघात होऊन तीनजण जखमी झाले. वेळुंजे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच बुधवारी ब्राह्मणवाडे शिवारात या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. ब्राह्मणवाडे येथील शेतात राहणारे ओहळ नाका येथील नवसू कोरडे यांची मुलगी नयना ही खेळत होती. त्यावेळी अंधारातून आलेल्या बिबट्याने आईसमोरच नयनाला फरफटत नेले. कोरडे कुटुंबियांनी आरडाओरड करून बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने नयनाला घरापासून काही अंतरावर टाकून पळ काढला. या हल्ल्यात नयनाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पश्चिम वनविभाग नाशिक वनपरिक्षेत्राचे गस्ती वाहन घटनास्थळी जाण्यास निघाले. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातपूरजवळ भरधाव मालवाहतूक वाहनाची गस्ती वाहनाला धडक बसली. या अपघातात चालक शरद अस्वले, प्रभारी वनक्षेत्रपाल फटांगरे, वनरक्षक चव्हाण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button