रेल्वेतून पडून पुण्याच्या दोन तरुणांचा मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

श्रीगोंदा: (आशोक कुंभार ) चालत्या रेल्वेतून पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा कारखाना रेल्वे फाटकाजवळ रविवारी रात्री घडली. अर्जुनसिंग सरबतसिंग टाक (वय 29, रा.
हडपसर, जि. पुणे) व दिनेश विजय पवार (वय 28, रा. गंज पेठ, जि. पुणे) अशी मयतांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 12) रात्री गेटमन बाळासाहेब छगन कांडेकर हे तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना फाटकावर कर्तव्य बजावत होते.

रात्री पावणेअकराच्या सुमारास कांडेकर यांना दोन तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध पडल्याचे दिसले. रेल्वे गेल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते दोन्ही तरुण मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांडेकर यांनी तत्काळ रेल्वे स्थानकप्रमुखांना ही माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. एका मयताच्या खिशात भ्रमणध्वनी सापडल्याने मयतांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. त्यामुळे मयतांची ओळख पटली. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दोघे एकाच वेळी खाली पडले कसे?
धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे मत आहे. दोन्ही व्यक्ती एकाच वेळी खाली कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत असून, त्यांना कुणी ढकलून दिले का? यादृष्टीनेही श्रीगोंदा पोलिस यंत्रणा तपास करीत आहे.