सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


फलटण :(आशोक कुंभार ) सोने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईतांना ग्रामीण पोलिसांनी गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली. संबंधितांकडून पोलिसांनी एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
सुबोध प्रताप शहा व अबोध प्रताप शहा (रा. पंछगंछिया, जि. भागलपूर, बिहार) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की दुधेबावी (ता. फलटण) येथील एका महिलेला दागिन्‍यांना पॉलिश करून देतो, असे सांगत हातचलाखीने तिचे पंचेचाळीस हजार रुपयांचे मंगळसूत्र व गंठण व दागिने लांबविल्याचा गुन्हा सहा मार्च २०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. संशयिताला गुणवरेतील मार्केट यार्डमधून ताब्‍यात घेतले.

संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर परांडा, कळंब पोलिस ठाणे येथेही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यातही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दुधेबावी येथील महिलेचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार व पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलिस हवालदार साबळे, पोलिस नाईक अभिजित काशीद, अमोल जगदाळे, धराडे, पोलिस कॉन्‍स्‍टेबल महेश जगदाळे, सचिन पाटोळे, निखिल गायकवाड, तुषार नलवडे व पोलिस नाईक राणी गळवे यांनी केली.

दरम्यान, फलटण ग्रामीण भागात जर अन्य कुणाची या पद्धतीने फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तातडीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.